दिव्यांगांच्या योजना (Disability Schemes), वैश्विक आधार कार्ड (Universal Aadhaar Card), प्रमाणपत्र एकाच स्थळी देण्यासाठी जिल्हास्तरीय ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचा प्रारंभ 25 सप्टेंबरला होणार असून यासाठी सर्व विभाग, दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संघटनांनी समन्वयातून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी दिल्या.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानांतर्गत पुर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय उपायुक्त विवेक इलमे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून सर्व विभागासह दिव्यांग संघटनेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. महापालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी स्व:खर्चाने दिव्यांगांना कार्यक्रमस्थळी ने-आण करावी. आशा व अंगणवाडी सेविकांनी ग्रामीण भागात अभियानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दिव्यांग उन्नती पोर्टलवरील नोंदणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जास्तीत जास्त दिव्यांगाची ऑनलाईन नोंदणी करावी, तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या योजना व साहित्यांची नोंद त्यात घ्यावी. महापालिकेनी त्यांच्या बसेसमध्ये दिव्यांगांना 100 टक्के दिलेल्या प्रवास सवलतीचा 23 मे ते 23 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या लाभाचा अभियानामध्ये उल्लेख करावा, असेही त्यांनी सांगितले.
सर्व विभागांनी आठवड्यातून एक दिवस 1 तास दिव्यांगाच्या प्रश्नासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देऊन त्यांना दिव्यांग योजनांची माहिती द्यावी व त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस महापालिकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.