अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात:मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवले

माझ्या सहा वर्षाच्या नातीचीही चौकशी केली, तरीही मी पवारांसोबतच राहणार!

31
अनिल देशमुख
अनिल देशमुख

नागपूर : माझ्यावर ईडी (ED), सीबीआय (CBI ) लावली, चौकशी झाली. पण कोर्टात केस गेली, आरोप करणाऱ्यांना बोलावले तेव्हा पोलिस आयुक्त (POLICE) आला नाही. शेवटी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Commissioner of Police Parambir Singh) याने आपण केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले, असे लिखित स्वरुपात जबाब दिला. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला. पण तरीही मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवले, असा आरोप अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी केला आहे.

दरम्यान अनिल देशमुख म्हणाले की, माझ्या सहा वर्षाच्या नातीचीसुद्धा चौकशी केली. माझ्या नातीला कॅडबरीचे आमिष दाखवून अर्धा तास चौकशी केली. माझ्यावर 130 धाडी टाकल्या. पण घाबरलो नाही. मी सांगितले, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. अशाप्रकारे आपल्या इतर साथीदारांसारख मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही.

मलाही ईडीचा धाक दाखवला

अनिल देशमुख म्हणाले की, ईडीचा धाक तर त्यांनी मलाही दाखवला होता. आमच्यासोबत समझौता करा, आमच्यासोबत या, असे म्हणाले. पण मी त्यांना सांगितले की, मी तुमच्यासोबत आयुष्यात कधी समझौता करणार नाही. त्यामुळे माझ्यावर मुंबईच्या पोलिस आयुक्ताला सांगून 100 कोटींचा आरोप करायला लावला. आपल्या पक्षाचे काही ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत गेले. शिवसेनेचे आमदार 50 खोक्यांच्या आमिषामध्ये गेले. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कशासाठी त्यांच्यासोबत गेले? तर हे सर्व ईडीच्या धाकाने तिकडे गेले.

तेव्हा दुसरा प्रयोग

अनिल देशमुख म्हणाले की, शिवसेनेचे आमदार ते कशामुळे फुटले, त्यांना कशाचे आमिष दाखवले, काय दिले? 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे आमदार भाजप सरकारमध्ये सामील झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लक्षात आले की हे आमदार सामील झाले तरी आपल्याला जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा न होता, याउलट तोटा झाला, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी दुसरा प्रयोग केला, असा दावा अनिल देशमुख यांनी केला

तेव्हापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू

अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या एक-दीड वर्षापासून काय चालले ते आपण पाहतोय. एक वर्षापूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. एक-सव्वा वर्षापूर्वी भाजपच्या लक्षात आले की, आपल्या स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करता येणार नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणता येणार नाही, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आले तेव्हापासून त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. त्यांनी आधी शिवसेनेचे 35 ते 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फोडले.

Google search engine