मराठा आंदोलन चिघळले, पत्रकारांनाही मारहाण

जालन्यात आज पुन्हा पोलिसांचा गोळीबार; आंदोलकांनी वाहने जाळली

5
मराठा आंदोलन
मराठा आंदोलन

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तुफान मारहाण झाली होती. या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभरात दिसून आले. जालना शहरात मराठा (Maratha movement)  समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी ( police) हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे जालना शहरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. सध्या जालना शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

जालना शहरातील प्रमुख भाग असलेल्या अंबड चौफुली येथे मराठा क्रांती (Maratha revolution) मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा (baton charge) निषेध करण्यात आला. या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन सुरू होताच, हा जमाव अनियंत्रित होऊन आंदोलकांनी परिसरातील खासगी वाहनांची जाळपोळ सुरू केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

जमावाने जाळला ट्रक

अंबड चौफुली भागात हे आंदोलन सुरू होताच जमावाने येथे उभा असलेला एक ट्रक जाळला. या व्यतिरीक्तदेखील काही खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्या नंतर जमावाने पोलिसांच्या दिशेने देखील दगडफेक केल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे या चौफुली परिसरात रस्त्यांवर दगड आणि विटांचा खच जमा झाला आहे.

पोलिसांचा हवेत गोळीबार

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येथे जमा झालेला समाज चांगलाच आक्रमक झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रूधुराचा मारा केला. त्यानंतर आंदोलक पळाले. मात्र, आंदोलनातील तरुणांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. सध्या जालना शहर आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.

आंदोलकांची पत्रकारांना मारहाण

आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना काही आंदोलकांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या शिवाय जाळपोळीचे फोटो घेण्यापासूनदेखील आंदोलकांनी पत्रकारांना रोखले होते. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

Google search engine