नागपूर : नागपूर (nagpur) येथील नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज (National Bureau of Soil Survey and Land Use) प्लॅनिंग (एनबीएसएसएलयुपी) या संस्थेद्वारे नानाजी देशमुख कृषी (agriculture) संजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील 17 जिल्ह्यातील 5 हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल मृदा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. नितीन पाटील यांनी दिली. एनबीएसएसएलयुपीचा 47 वा स्थापनादिन उद्या १ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ( Indian Council of Agricultural Research)अखत्यारित असणाऱ्या नागपूरच्या अमरावती रोड स्थित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग या संस्थेद्वारे महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल मृदा संशोधन केले जात असून त्याप्रमाणे पीक लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत देखील झारखंड, बिहार, अंदमान सह अनेक राज्यांना कृषी विषयक मार्गदर्शन दिले जात आहे.
संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून “भूमी’ या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे रासायनिक त्याचप्रमाणे भौतिक परीक्षण देखील पाहणे शक्य होणार असल्याची माहिती संचालक डॉ. नितीन पाटील यांनी दिली. एनबीएसएसएलयुपी ही संस्था गेल्या ४६ वर्षापासून भारतातील भूसंपत्तीची माहिती संकलित करून असून त्याचे दस्तऐवजीकरण करत आहे. या संस्थेचे बंगळुरू, कोलकाता, जोरहाट, नवी दिल्ली, उदयपूर येथे प्रादेशिक केंद्र असून या संस्थेचे मुख्यालय हे नागपुरात आहे.