नागपूर : भाजपाच्या (bjp) अल्पसंख्याक *(minority)विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (sana khaan) (वय 34, रा. अवस्थीनगर) यांच्याकडे असलेल्या तीनपैकी दोन मोबाइलमध्ये चार डझनपेक्षा अधिक चित्रफिती (Film tape) आहेत. यात राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. कमलेशला ताब्यात घेतल्यानंतर ही खळबळजनक माहिती समोर आली. या वृत्ताला एका पोलिस (police) अधिकाऱ्याने दुजोरा दिला. दरम्यान 20 दिवस उलटूनही सना खानचा मृतदेह सापडत नसल्याने प्रकरण एकाच जागी थांबलेले आहे.
सना अपहरण आणि हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अमित, कमलेश, अमितचा मित्र राजेश सिंग, नोकर जितेंद्र गौड व धमेंद्र यादव या पाच जणांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 2 ऑगस्टला सकाळी सना यांची हत्या केल्यानंतर अमितने त्यांच्या पर्समधून काढलेले तीन मोबाइल विश्वासू असलेल्या धमेंद्रला दिले. धमेंद्रने तिन्ही मोबाइलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खास असलेल्या कमलेशकडे सोपविली होती.
धर्मेंद्रच्या अटकेनंतर पोलिसांनी मोबाइलबाबत विचारणा केली असता कमलेशचे नाव समोर आले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. जबलपूरमधील मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ एक मोबाइल लपविला असून अन्य दोन मोबाइल नर्मदा नदीतील धरणात फेकल्याची माहिती कमलेशने पोलिसांना दिली. पोलिसांनी विहिरीजवळील मोबाइल जप्त केला.
अन्य दोन मोबाइलबाबत कसून चौकशी केली असता या दोन मोबाइलमध्ये पन्नासहून अधिक चित्रफिती असल्याचे कमलेशने पोलिसांना सांगितले. धरणात मोबाइल फेकल्याचे तो सांगत असला तरी त्याने हे मोबाइल कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे. पोलिस आता या दोन मोबाइलचाही शोध घेणार असून, ते आढळल्यानंतर त्यातील चित्रफितींमुळे अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता आहे..