नागपूर : भंडारा (bhandara) पोलिस (police) ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश केशवराव साठवणे (वय 45 वर्ष, रा. हनुमान वॉर्ड तकीया रोड , भंडारा) यांना 10 हजार रुपयांची लाच (bribe) घेताना अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री 17 ही कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचा मुलगा आयुष डांगारे व अन्य तीन इसमा विरुद्ध भंडारा शहर पोलिस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातून तक्रारदार यांच्या मुलाचे नाव वगळून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक साठवणे याने तक्रारदार यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी 10 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीवरून 17 ऑगस्ट रोजी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी साठवणे याने 10,000 रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यावरून सापळा रचून 10,000 रुपये स्विकारताना आरोपी साठवणे याला ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, डॉ.अरुणकुमार लोहार, अमित डहारे, संजय कुंजरकर, गोस्वामी, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार,चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे, विष्णू वरठी, राहुल, अभिलाषा गजभिये यांनी केली.