
शिर्डी : मी पुन्हा येईन या माझ्या वाक्याची अजूनही दहशत आहे. काल त्याचा प्रत्यय आला. लोकांनी मला पुन्हा आणले होते. पण काहींनी बेईमानी (Dishonesty) केल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मात्र आता मी या बेईमानांचा संपूर्ण पक्षच घेऊन आलो आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी शरद पवार व ठाकरे गटावर (uddhav thakre) निशाणा साधला आहे.
अहमदनगरच्या शिर्डीत गुरुवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. माझ्या मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते. काल राष्ट्रीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांच्या मी पुन्हा येईन म्हणण्याचा आदर्श घेतल्याची टीका केली. मी पुन्हा येईन म्हणालो होतो. त्यानुसार लोकांनी पुन्हा मला आणलेही होते. पण काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून मी येऊ शकलो नाही.
पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे शंका ठेवण्याचे कारण नाही, असे ते पवारांवर निशाणा साधताना म्हणाले.
होय, आमची आहे मुख्यमंत्रीपदावर नजर
आज राज्यात एक मजबूत सरकार आहे. पण त्यानंतरही काहीजण दिवसा स्वप्न पाहत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका करत आहेत. होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे संरक्षण करायचे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर करणाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोघे उपमुख्यमंत्री करू, असे फडणवीस म्हणाले.