इंफाळ: मणिपूरमधील 9manipur) मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचाराला गुरुवारी तीन महिने पूर्ण झाले. गुरुवारी बिष्णुपूरमध्ये सुरक्षा दल (security forces) आणि मेतेई समुदायामध्ये हिंसक चकमक झाली. परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान 17 जण जखमी झाले.
एका वृत्तानुसार, बिष्णुपूरमधील मेईतेई समुदायातील महिलांनी बफर झोन ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आसाम रायफल्सने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. महिलांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चकमकीनंतर इंफाळ आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांतील संचारबंदी मागे घेण्यात आली.
मणिपूरमध्ये आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांचे मृतदेह इंफाळ आणि चुराचंदपूर येथील रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. आज कुकी-जो समाजातील 35 लोकांचे मृतदेह चुराचंदपूर येथे एकत्रितपणे दफन करण्यात येणार होते. मात्र, गृहमंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
कुकी-जो समुदायाच्या संघटनेच्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्या म्हणण्यानुसार, चुराचंदपूर जिल्ह्यातील लामका शहरातील तुयबोंग शांतता मैदानावर दफन करण्यात येणार होते. पण, मणिपूर उच्च न्यायालयाने या ठिकाणी यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बेपत्ता लोकांना शोधण्याच्या मागणीसाठी पुन्हा निदर्शने
इम्फाळमधील पटसोई विधानसभा मतदारसंघातील अपुंबा तेनबांग लुप येथील महिलांनी २६ दिवसांनंतरही २ किशोरवयीन मुलांना शोधून काढले नाही. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून राज्यात दोन पत्रकार आणि दोन किशोरांसह 27 लोक बेपत्ता आहेत. मोरेहून सुरक्षा दलांना हटवल्यामुळे कांगपोकपी गुरुवारी 12 तासांसाठी बंद राहणार आहे.
3 मे रोजी, मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाला अनुसूचित जमाती (SC) दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. त्यानंतर तेथे जातीय संघर्ष पेटला. तेव्हापासून तेथे 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.