अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पो. निरीक्षक विनायक गोल्हे यांचा महिला कट्टातर्फे सत्कार

कर्तव्यावर असतांना विशेष कामगिरी केल्याबद्दल केला सन्मान

7
महिला कट्टा
महिला कट्टा

महिलांचे व्यासपीठ महिला कट्टातर्फे (mahila katta ) आज (ता. १) ‘फास्टेस्ट फास्” या उपक्रमाअंतर्गत अंबाझरी (ambazari) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक नामदेव गोल्हे यांचा कर्तव्यावर असताना विशेष कामगिरी (Performance)  केल्याबद्दल सत्कार (felicitation) करण्यात आला.

शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर महिला कट्टाच्या संयोजिका प्रगतीताई पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे, समाजसेविका अरुणा सबाने, माजी महापौर मायाताई इवनाते, महाराष्ट्र टुरिझम विभागाचे अधिकारी दिनेश कांबळे, पलाश कलकोटवार उपस्थित होते.

२२ जुलै रोजी २५ वर्षीय विद्यार्थिनी रक्षंदा गाजलवार या तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी विनायक गोल्हे यांनी तत्परता दाखवित या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक करून कार्यतत्परतेचा परिचय दिला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महिला कट्टातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कट्टाच्या संयोजिका प्रतिभाताई पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी स्व. रक्षंदा यांच्या परिवाराचे सांत्वन करीत घटनेची गंभीरता व्यक्त केली. सोबतच चांगली कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांचे कौतुक केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा घटनांमध्ये पुढे येऊन जखमी व्यक्तींची मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माजी महापौर मायाताई ईवनाते अनेक अनुभव व्यक्त करीत समाजाने यातून शिकण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान स्व. रक्षंदा यांचे बंधू पलाश कलकोटवारसुद्धा उपस्थित होते. त्यांनी अशा घटनांमध्ये कडक कायदे बनवून आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.

सत्कारमूर्ती अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी सत्काराला उत्तर देताना, घटनेविषयी माहिती देत अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले. वर्दीतही एक माणूस असतो तो देखील भावनिक होतो, असे म्हणत त्यांनी महिला कट्टाच्या कार्याची प्रशंसा करीत सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाजसेविका अरुणा सबाने यांनी आपल्या भाषणात अनेक विषय मांडले. सोबतच पोलिस खात्यासोबत काम करीत असतानाचे अनेक तिखट गोड अनुभव व्यक्त केले. यावेळी त्यांनी विनायक गोल्हे यांचे कौतुक केले. सोबतच समाजात काम करीत असताना स्त्रियांवरचे अत्याचार, त्यांची होणारी हेळसांड इत्यादी विषयांवरील अनुभव सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जयंता देशमुख यांनी केले.

Google search engine