मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

46

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ३ मार्च रोजी निकाल राखून ठेवल्यानंतर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी वेरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला.

दरम्यान, या दोघांना अनेक अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे दोघे ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडून जाऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे पासपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील. या दोघांना ते कुठे राहतात यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणी गोन्साल्विस आणि फरेरा 2018 पासून तुरुंगात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अशाच एका प्रकरणात सहआरोपी सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, असा युक्तिवाद दोघांनी केला. भीमा कोरेगाव प्रकरण पुण्यातील शनिवार वाडा येथे कोरेगाव-भीमा लढाईच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिषदेशी संबंधित आहे. परिषदेनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Google search engine