आरोपी अनंत जैन याचे कुटुंबीय गायब

तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे दोन मित्रही फरार

7

नागपूर : ‘ऑनलाइन गेमिंग’च्या (‘Online Gaming’) नावाखाली ॲप तयार करून नागपुरातील व्यापाराला तब्बल ५८ कोटींचा गंडा घातल्या गेल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी अनंत जैन (Anant Jain) याच्या तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणात सोमवारी अनंत जैन याची पत्नी, आई, भाऊ आणि मुले सोमवारी गायब झाली. तर यातील तक्रारदार व्यावसायिकाचे नागपुरातील दोन मित्रही फरार असल्याने या प्रकरणाचे रहस्य वाढले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आरोपी अनंत जैन याच्या काकानेही चौकशी टाळल्याचे समजते. गायब झालेले अनंत जैन याच्या कुटुंबातील सदस्य, नागपुरातील दोन मित्र आणि साथीदारांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके सक्रिय केली आहे.

एका सट्टेबाजी प्रकरणांत सोनेगाव पोलिसांनी ऑनलाईन सट्टा प्रकरणातील आरोपी व सध्या फरार असलेला कुख्यात बुकी यवतमाळचा बंटी उर्फ अमित चोखानी हा सध्या दुबईत असून पोलिसांनी त्याच्या विरूद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. या दरम्यान सध्या जामीनावर असलेला बुकी सिराज याची पोलिसांनी तीन तास कसून चौकशी केली.

अनंत जैन दुबईत असून त्याला परत आणण्याच्यादेखील हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मूळचा गोंदिया येथील असलेल्या अनंत जैनने बनावट गेमिंग ॲपच्या जाळ्यात नागपुरातील अग्रवाल या व्यापाऱ्याला ओढले व त्याला तब्बल ५८ कोटींचा गंडा घातला. व्यापाऱ्याने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यावर जैनविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली.

अग्रवालने ऑनलाईन गेमिंगमध्ये बंपर परतावा मिळेल या अपेक्षेने आधी स्वत:जवळील सर्व पैसे लावले. त्यानंतरदेखील त्याच्या मनात आशा कायम होती व त्यासाठीच त्याने १४ ते १५ इतर व्यापारी मित्रांकडून पैसे उधार घेतले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Google search engine