मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतही पावसाच्या सरी कोसळत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहे. सीएसटी स्थानकात लोकांची गर्दी झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी बाबत पत्रकारांशी संवाद साधला.
“मी सकाळपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आपात्कालीन यंत्रणा, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या सगळ्यांना अलर्ट करण्यात आलंय. आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्या आहेत.” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
SDRF आणि NDRF अलर्टवर
सर्व जिल्ह्यांमध्ये आमची यंत्रणा अलर्टवर आहे. NDRFला पूरस्थिती कुठे आहे हे माहीत आहे का? तसेच, ज्याठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, तेथे त्यांच्या तुकड्या तैनात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही काळजी घेत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अडकलेल्या लोकांना बचावाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनाही आम्ही घरी पाठवलं आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही पाठवण्यात आलं आहे.
नागरिकांनी देखील अशा प्रकारचा अलर्ट असतो तेव्हा आपल्याला घराबाहेर कामाशिवाय पडायचं नसेल तर पडू नये. सुरक्षित स्थळी रहावं असंही आवाहन मी सगळ्याच जनतेला करतो आहे. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिल्यावर प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.