मुंबई : मुंबईलगतच्या (mumbai) ठाणे जिल्ह्यातील कल्याण – ठाकुर्ली दरम्यान एक 4 महिन्यांचे तान्हुले वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना (heartbreaking event) घडली आहे. पीडित महिला आपल्या काकांसोबत लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत जात होती. बाळ तिच्या काकांच्या हातात होते. ते त्यांच्या हातातून निसटले अन् थेट वाहत्या नाल्यात पडून वाहून गेले. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अंबरनाथ लोकल ठाकुर्ली ते कल्याण या दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटेसे बाळ घेऊन एक महिला व तिचे काका चालत होते. त्यावेळी अचानक त्या काकांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटले आणि थेट नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. काही क्षणांतच हे बाळ नाल्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.
काही तरुणांनी लगेचच नाल्याच्या दुसऱ्या बाजूने धाव घेत बाळाचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. दुसरीकडे, पीडित मातेच्या आक्रोशाने अनेकांच्या डोळे पाणावले. रेल्वे पोलिस वाहून गेलेल्या बाळाचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 4 महिन्यांचे बाळ वाहून गेल्याची घटना अत्यंत दुखद आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विशेषतः कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, दिवा स्थानकाच्या पुढे लोकल 2 तासांपेक्षा अधिक वेळ थांबल्या आहेत. यामुळे येथीही प्रवाशी खाली उतरून रुळांवरून चालत जात आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत. यामुळे रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अबंरनाथ-बदलापूर दरम्यान काही ठिकाणी रुळाखालील खडी वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.