राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

47

Monsoon : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण विदर्भात पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप बघायला मिळणार आहे. यासोबतच कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून, शेतकऱ्यांची चिंता मिटण्याची आशा आहे. राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाची तूट असल्याचं चित्र आहे. पेरण्यांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे तर कुठे दुबार पेरण्या होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे.

हवामान विभागाचा अंदाज?

– संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा.
– विदर्भात पुढील पाच दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
– मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा.
– 17 जुलैपासून पुन्हा तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
– सोबतच उत्तर महाराष्ट्रात आज विजांसह पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट बघायला मिळत आहे. हिंगोली आणि सांगलीत तर मोठी भीषणपरिस्थिती आहे. 15 जुलैपर्यंत हिंगोतील सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत फक्त 28 टक्के पाऊस झालाय. सोबतच जालन्यात 46 टक्के, अकोल्यात 58 टक्के, सोलापूर 53 टक्के, कोल्हापुरात 65 टक्के, वर्ध्यात 64 टक्के सरासरीच्या पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची तूट धरणांमधल्या पाणीसाठ्याबाबत चिंतेचा विषय ठरतोय.

पुढील 15 दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ वर्तवत आहेत. 18 जुलैपासून मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाअभावी निर्माण झालेली तूट भरून निघणार का? आणि शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Google search engine