सप्तश्रृंगीगड घाटात भीषण अपघात; ‘या’ उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

52

नाशिक : नाशिकमधील वणी येथील सप्तश्रृंगी घाटात ३५ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातातील जखमींना तातडीने आवश्यक ते वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.

बुधवारी (१२ जुलै) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती घेतली. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मदतकार्य सुरू असल्याचे सांगून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

बुलढाण्यातील खामगाव आगर येथून राज्य परिवहन महामंडळाची बस मंगळवारी रात्री उशिरा सप्तशृंगी गडावर आली. बुधवारी सकाळी परतीचा प्रवास सुरू केला. घाटमार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारणपणे 32 प्रवासी होते. जखमींपैकी 15 जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने अजूनही मदतकार्य सुरू असल्याची माहिती विभागीय परिवहन अधिकारी किरण भोसले यांनी दिली.

पालकमंत्र्यांची सूचना

सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी दक्षता घेण्याची सूचनाही भुसे यांनी केली आहे.

Google search engine