चंद्रपूर : सावली वन परिक्षेत्रांतर्गत व्याहाड खुर्द उपवनातील सामदा बूज वन बीट अंतर्गत येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर या परिसरात पिंजरे लावले असता मादी बिबट्या आणि तिचे दोन बछडे जेरबंद करण्यात आले आहे.
या भागातील ग्रामस्थांचा रोष पाहून वैनगंगा नदीच्या काठावर वनविभागाने हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले. रविवारी रात्रीच्या सुमारास हल्ला करणारी मादी बिबट्या आणि तिचे दोन पिल्ले त्या पिंजऱ्यात अडकले. वाघोली बुटी परिसरात वाघ आणि बिबट्याने महिनाभरात धुमाकूळ घातला होता. 20 दिवसांपूर्वी याच परिसरात ममता बोदलकर या महिलेचा वाघाने बळी घेतला. शनिवारी वाघोली बुटी येथील प्रेमिला रोहणकर या शेतमजुरीवर याच मादी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते.
बिबट्याचे अख्ख कुटुंब पिंजराबंद झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र याच भागात एक वाघदेखील सातत्याने फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली आहे. याच माहितीच्या आधारावर वन विभाग वाघावरदेखील लक्ष ठेवून आहे.