कपड्यावर मासिक पाळीच्या रक्ताचे डाग,भावाने केली हत्या…

चारित्र्यावर संशय घेऊन स्टीलच्या पकडीने व लाथाबुक्याने अमानुषपणे मारहाण...

202

नवी मुंबई : १२ वर्षीय अल्पवयीन बहिणीच्या कपड्यावर मासिक पाळीच्या रक्ताचे डाग पाहून ३० वर्षीय भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन स्टीलच्या पकडीने व लाथाबुक्याने अमानुषपणे मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निर्दयी भावावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रिजेश ( वय ३०) असे अटक केलेल्या भावाचं नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ही अल्पवयीन असून मूळची उत्तरप्रदेश मधील असून कुटूंबासह राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भाऊ आणि वहिनीकडे तिच्या पालनपोषणाची जबादारी दिली होती. त्यातच मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. मात्र, तिला येत असलेल्या पाळी बद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तिच्या कपड्यावर मासिक पाळीमुळे रक्तस्त्राव होऊन कपड्यांवर रक्ताचे डाग पडत होते. मृतक बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्दयी भावाने सलग चार दिवस तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत ती घरात बेशुद्ध पडल्याचे पाहून तिला भावानेच मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र , येथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित बहिणीच्या गुप्त भागातून मासिक पाळी मुळे रक्त येत होते. त्याबाबत आरोपी भावाने तिच्याकडे विचारना केली होती. मात्र मृतक बहिणीला या विषयी काहीच माहिती नसल्याने ती काहीही बोलत नव्हती, त्यामुळे संतापलेल्या निर्दयी भावाने राहत्या घरीच सलग चार दिवस बेदम मारहाण केली, या मारहाणीत तिचा मृत्यूझाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. दरम्यान , याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता, १२ मे रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे उल्हासनगर शहर हादरले असून निर्दयी भावाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Google search engine