नागपूरसह 5 शहरांत सीबीआयचे छापे, परराज्यातील सात जण अटकेत.
नागपूर (Nagpur) : एका शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशातील सहा शहरात छापेमारी (Raid) केली. या छाप्यात एका खासगी कंपनीच्या मालकासह ७ जणांना अटक केली. यामध्ये खासगी कंपनीच्या मालकासह ब्रीज अँड रूफ कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी संचालकांचा कार्यकारी सचिव आशिष राजदान याचाही समावेश आहे. अन्य आरोपींमध्ये एच. पी. राज्यगुरू (राजकोट) कंपनीचे मालक हेतलकुमार प्रवीणचंद्र राज्यगुरू, शशांकुमार जैन (कोलकाता), सोमेश चंद्र (नोएडा-उत्तर प्रदेश), वीर ठक्कर (मुंबई), राजीव रंजन (दिल्ली), तरंग अग्रवाल (दिल्ली) यांचा समावेश आहे.
२६ लाख केले जप्त
या छाप्यात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि २६.६० लाखांची रक्कम सीबीआयने जप्त केली. नागपुरातील नरेंद्रनगरातील एका शिक्षिकेच्या घरावर सीबीआयने मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत कारवाई केली. शिक्षिकेचा पतीसुद्धा शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्या प्रकरणात आरोपी आहे.