महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई.
नागपूर (Nagpur) : एका महत्त्वपूर्ण कारवाई अंतर्गत नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपूरजवळील मौदा टोल नाक्यावर 42 लाख रुपयांचा 211 किलो गांजा केला जप्त केला.
ट्रॅक्टरमधून नेला जात होता गांजा
यासंबंधीच्या वृत्तानुसार, एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून हा गांजा नेण्यात येत होता. त्याची खबर मिळतच अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर रोखून ट्रॉलीची सखोल तपासणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांना ट्रॉलीच्या तळाशी खास तयार केलेला कप्पा आढळला. या कप्प्यात 100 पाकिटात तब्बल 211 किलोग्रॅम गांजा लपवून ठेवण्यात आला होता.
चौकशीअंती दोघांना अटक
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकाने या वाहनातून प्रवास करणाऱ्या 2 व्यक्तींना तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. या संदर्भात पुढील तपास सुरू असून, हा गांजा नेमका कुठून आला व कोणी पाठवला याचा तपास महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी करीत आहे.
12 ऑक्टोबर रोजी तिघांना अटक
यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातून पोलिसांनी 3 आरोपींकडून 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा गांजा जप्त केला होता. मुरुमगाव पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपीला अटक केले आहे. ते छत्तीसगडमधून गांजाची तस्करी करीत होते. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली होती.
छत्तीसगड (Chattisgarh) राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात गांजाची तस्करी होत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार, मुरुमगाव पोलिसांनी सापळा रचून गाड्यांची तपासणी केली. गाडीतील 3 जणांकडे गांजा सापडला. एमएच-04-सीएम-2515 या क्रंमाकाच्या होंडा सिटी कारमधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. हे तिन्ही आरोपी मुंबईचे रहिवासी असल्याचे माहिती मिळाली आहे. उमर फैय्याज अहमद शेख, राकेश राजु वरपेटी, शहबाज सरवर खान अशी या तिन्ही आरोपींची नावे आहे.